प्रस्तावना
आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदोग्यिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.
हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. तसेच संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.
भात उत्पादनातील समस्या
राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करीत आहेत. तरीसुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी असून त्यास बरीच करणे आहेत. राज्यातील भात उत्पादनातील महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत, याविषयीची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
- सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र.
- सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतीलुत वापर.
- कीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.
- वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.
- राज्यातील भातशेती करणारे सुमारे 80 ते ८५ टक्के अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती त्यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर.
- समुद्र किनाऱ्यालगतच्या खार जमिनीत अनियमित व अपुऱ्या अथवा जादा पावसामुळे होणारे नुकसान.
- मराठवाडा विभागात जमिनीतील लोहाच्या कमतरतेमुळे भात पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारे अनिष्ट परिणाम.
- वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा विलंब.
- सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रसार.
- अति बारीक, लांब दाण्याचा व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.
भाताच्या सुधारित जाती
आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. – ८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.
भाताचे वाण
अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींची वैशिष्ठये या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.
- पाने जड, रुंद व उभात आणि गर्द हिरव्या रंगाची असल्याने कर्बग्रहण कार्य अधिक प्रभावीपणे होते. तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीर्घकाळापर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात. त्यामुळे पानातील लोंबीत पळीजांचे प्रमाण कमी राहते.
- या जाती इंडिका प्रकारातील असल्यामुळे दाणा पांढरा असून, शिजविल्यावर चिकट होत नाही. भात भरडल्यानंतर भाताचे शेकडा प्रमाण स्थानिक जातीपेक्षा जास्त असते. तांदूळ जाडा भरडा असून त्यांत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
- चुडांना जास्त प्रमाणात फुटवे येतात. त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात म्हणजे प्रथम व नंतर येणाऱ्या फुटव्यांच्या फुलोऱ्यातील अंतर कमी असते. त्यामुळे मुख्य आणि इतर फुटव्यांच्या लोंबीतील दाण्यांच्या संख्येत कमी तफावत राहते. पीक तयार झाल्यावर दाणे शेतात गालात नाहीत.
- दिवसमानातील सुर्यप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास कमी प्रमाणात संवेदनशील परंतु तापामानातील फरकास विशेष संवेदनशील असतात. त्यामुळे एकाच हंगामात पीक तयार होण्यास वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक दिवस लागतात. तसेच उन्हाळी हंगामात पीक तयार होण्यास सुमारे १५ ते २० दिवस अधिक लागतात.
- या जातीत शोषण केलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमपणे वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे पिकाची फाजील वाढ न होता खताच्या प्रमाणात दाण्याचे उत्पादन वाढते.
- या जाती महत्वाच्या रोग व किडीस काही प्रमाणात प्रतिकारक आहेत.
जमीन व हवामान
भात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.
बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया
अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे, तसेच ते दर तीन वर्षांनी बदलाने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत 24 तास वाळवावे. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
भातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. ज्या ठिकाणी उदबत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी बियाणे ५० से. ग्रे. अंश तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर ते चांगले सुकवून पेरणीसाठी वापरावे.
रोपवाटिका व्यवस्थापन
रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. नंतर १२० से.मी. रुंद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे) ऊंच आणि शेताचा आकार व उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली तसेच ज्या ठिकाणी हंगामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा ठिकाणी गादी वाफ्याची उंची ३ ते ५ से. मी. ठेवली तरी चालते. गादी वाफे करणे शक्य नसेल तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूंनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील.
गादी वाफे तयार करण्यापूर्वी दर आर क्षेत्रात (१ गुंठ्यास) एक गाडी याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे, गादी वाफा तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर तीन किलो याप्रमाणे चांगल्या कंपोस्ट खताचा थर दयावा. नंतर त्यावर दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. पावसाला सुरु होताच ७ ते ८ से.मी. अंतरावर ओळीत व १ ते २ से. मी. खोल बियाणे पेरून मातीने झाकावे. पावसाचा अंदाज पाहून साधारणतः ३ ते ४ दिवस आधी धूळवाफेवरही बियाणे पेरण्यास हरकत नाही. पेरणीनंतर १५ दिवसांनी परत दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बियाणे वापरून रोपे तयार करावीत. प्रती हेक्टरी लागणारे बियाणे हे दाण्याची प्रत आणि लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडांच्या संख्येवर अवलंबून आहे. प्रती हेक्टर क्षेत्राला लागणारे बियाणे पुढीलप्रमाणे
दाण्याची प्रत |
प्रती हेक्टरी बियाणे (किलो) |
बारीक दाणा (झिनिया, कोलन गट) |
२५.५ |
मध्यम दाणा (रत्ना गट) |
२५ ते ३० |
जाड दाणा (जया गट) |
३० ते ४० |
लावणीचे वेळी अंतर कमी केल्यास (१५ X १५ से.मी.) बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ५ ते १० किलोने वाढविणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत तणांचा नाश करण्यासाठी १ ते २ वेळा निंदनी करावी अथवा ब्युटाक्लोर किंवा बेंथीओकार्ब हे तणनाशक १ लिटर पाण्यात ६ मि. ली. मिश्रण करून १ आर क्षेत्रावर पेरणीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी २ ओळीमध्ये फवारावे. तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी म्हणजेच रोपास ६ वे पान फुटल्यानंतर रोपाची लावणी करावी. पावसाच्या अभावी अथवा इतर कारणाने लावणी लांबणीवर पडल्यास दर आर क्षेत्रातील रोपास १ किलो युरिया अथवा दोन किलो अमोनिअम सल्फेटचा तिसरा हप्ता दयावा. लावणीसाठी रोपे काढणीपूर्वी दोन दिवस वाफ्यातील पाण्याची पातळी ५ ते १० से. मी. पर्यंत वाढवावी.
रोपाची लावणी:- रोपे लावताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी. उदा. हळव्या जाती २० ते २३, निमगरव्या २५ व गरव्या जाती २५ ते ३० दिवसांनी लावाव्यात. एका चुडात फक्त ३-४ रोपे लावावीत. रोपे सरळ आणि उथळ म्हणजेच २ ते ४ से. मी. खोलवर लावावीत. रोपांची तिरपी व खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी १५ X १५ से. मी. अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी २० X १५ से.मी. अंतर ठेवावे.
राइस स्टेम बोअरर उर्फ तांदुळाच्या खोडकिडीचे व्यवस्थापन (स्रोत: www.vikaspedia.in)
राइस स्टेम बोअररमुळे कणसांची संख्या व एकंदर उत्पादन घटते. ह्या किडीच्या सहा प्रमुख प्रजाती आहेत आणि त्या भातपिकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खोडकिड्याच्या चार जाती सापडतात – स्कर्पोफेगा इंसर्ट्यूला (पिवळ्या रंगाचा), चिलो सप्रेसालिस (अंगावर पट्ट्या असलेला), चिलो ऑरिसिलस (सोनेरी) आणि सेसामिया इन्फरन्स (गुलाबी) ह्या जाती वेगवेगळ्या अवस्थांतील भातपिकाचे अखंड नुकसान करीत असतात असे अडुथुराई येथील तामिळनाडू भात संशोधन संस्थेच्या एका संशोधनात्मक पाहणीत आढळले आहे.
खोडात राहणार्या अळ्या (लार्व्हा) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक नलिका तोडतात आणि ह्यामुळे पीक तुर्यावर येण्याआधीच 'डेड हार्ट्स' तयार होतात किंवा तुरे आल्यानंतर 'व्हाइट हेड्स' किंवा 'व्हाइट इअर' दिसून येतात.
पोषक घटक
हवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.
व्यवस्थापनात्मक उपाय
किडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा -
- (हवामानानुसार) लवकर तयार होणार्या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे
- जमिनीचा pH ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.
- बियाण्यावर प्रक्रिया करणे - प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.
- रोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे
- पिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.
- रोपांची पुर्नपेरणी केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या पुर्नपेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे.
सघन (SRI: System for Rice Intensification) पद्धतीने भात लागवड (स्रोत: www.vikaspedia.in)
प्रस्तावना
मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गांवात 2010 पासून 'वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट' संस्थेचे वातावरण बदलाशी अनुकूलन कार्यक्रम या प्रकल्पावर काम चालू आहे. या कार्यक्रमात गांवात विविध 14 घटकांवर काम केले जाते. त्यात शेती हा एक मुख्य घटक असल्यामुळे शेती घटकावरही केले जात आहे. शेती विकासासाठी खरीप व रब्बी हंगामामध्ये निवडक व इच्छुक शेतक-यासोबत प्रायोगिक तत्वावर पिक प्रात्याक्षिके घेण्यात येतात. या वर्षी म्हणजे 2012 मध्ये खरिप हंगामात गांवात संस्थेच्या हस्तक्षेपाने शेतीशाळा घेण्यात आली. यात एकूण 17 शेती शाळा घेण्यात आल्या. या शेतीशाळेचा मुख्य उद्येश म्हणजे कमी खर्चात भाताचे उत्पादन वाढवणे व त्यातुन शेतक-यांच्या उत्पन्नात भर टाकणे होय. यासाठी गांवातुन एकूण 22 शेतक-यांचा या शेतीशाळेसाठी सहभाग घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एस.आर.आय. पध्दतीने भात लागवडीचे शेतीशाळेत सहभागी शेतक-यांना प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष प्रत्येक शेतक-याच्या प्लॉटवर जाऊन भात लागवडीसाठी क्षेत्र मोजणी, बी पेरणी, चिखलणी, भात रोप लागवड, खताची मात्रा व खत देण्याची पध्दत, तसेच प्रत्येक स्टेजला कृषी सल्ल्याचा वापर करून हवामानानुससार भातावर कोणते रोग पडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कोणत्या औषधांची फवारणी करावी व सर्वात शेवटी कापणी कधी करावी या सर्वावर राहूरी कृषी विद्यापीठ शाखा इगतपुरी, शासकीय कृषी अधिकारी व वॉटरचे कृषी तज्ञ डॉ. वाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पळसुंदे येथे पार पाडण्यात आल्या.
या उपक्रमाचा जो उद्येश होता तो ख-या अर्थानपे पुर्ण झाला असे म्हणता येईल. कारण शेतीशाळेच्या उपक्रमात ज्या ज्या शेतक-यांनी सहभाग घेतला त्या सर्वच शेतक-यांना भाताचे भरघोस उत्पादन निघाले. यात सरासरी एकरी 38 पोते भाताचे उत्पादन मिळाले असून याउलट पारंपारिक पध्दतीने एकरी सरासरी 17 पोतेच भात होत असल्याचे दिसून आले.
यासंदर्भात आणखी माहितीसाठी अशाच एका शेतक-यांचा व्यक्तीगत अभ्यास पुढीलप्रमाणे
शेतक-याचे नांव – श्री. सुधीर धर्मा संगारे
पत्ता - मु. पो. पळसुंदे ता. अकोले जिल्हा अहमदनगर
वय - 31
शिक्षण - 10 वी
कौटुंबिक व सामाजिक स्थिती - या शेतक-याच्या कुटूंबात एकूण 5 व्यक्ती आहेत. त्यात आई-वडिल, पत्नी आणि 2 अपत्ये यांचा समावेश आहे. या व्यक्तीचे सामाजिक स्थान चांगले असून नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे सामाजिक कार्यातही नेहमीच सहभाग असतो. या व्यक्तीची आर्थिक सिथती मात्रा जेमतेमच आहे.
शेतक-याची समस्या
या शेतक-याची मुख्य समस्या म्हणजे कमी उत्पन्न होय. शेतक-याला क्षेत्र कमी असणे आणि भांडवल कमी असणे या 2 कारणामुळे उत्पन्न कमी निघते.
समस्येचे निराकरण
या शेतक-याच्या वरील समस्येचे निराकरण म्हणजे SRI ही भरगोस उत्पादन देणारी भात लागवडीची पध्दत आहे. गांवात वॉटर संस्थेने जी शेतीशाळा घेतली त्यातील 22 शेतक-यांमध्ये श्री. संगारे यांचाही सहभाग होता व त्यांनी देखिल एस आर आय पध्दतीने भात लागवड केली होती.
या शेतक-याने पुढिल प्रमाणे भात लागवड केली:
- भात लागवडीचा गट नं. 2
- भात लागवड क्षेत्र - 8 गुंठे
- भाताचा वाण दफतरी 9
- बियाणे 1.5 कि. ग्रॅ.
- एस आर आय पध्दतीने लागवड करताना वापरलेल्या रोपांची संख्या 2 काडी
- मागील वर्षी पारंपारिक पध्दतीने लागवड करताना वापरलेल्या रोपांची संख्या 5 ते 6 काडया
- भातासाठी वापरलेले खत युरिया ब्रिकेट – 20 कि. ग्रॅ.
भातावर पडलेला रोग – करपा
- भातावरील रोग जाण्यासाठी केलेली फवारणी – एम 45
- भाताचे एकूण उत्पन्न – 7 पोते
- चालू वर्षाचा एस आर आय पध्दतीमुळे मिळालेला पेंढा 40
- मागील वर्षाचा पारंपारिक पध्दतीमुळे मिळालेला पेंढा 32
- भाताची झालेली वाढ – 3 ते 3.5 फूट
- मशागतीपासून ते भात पोत्यांमध्ये भरेपर्यंतचा एकूण खर्च 2550 रू.
वरील माहितीनुसार या शेतक-याचे या वर्षाचे याच क्षेत्रातील भाताचे उत्पन्न 7 पोते झाले आहे.या अगोदर या शेतक-याने एकदाही 4 पोत्यांपेक्षा अधिक पोते भाताचे उत्पन्न काढलेले नव्हते. भाताचे उत्पन्न अधिक तर मिळालेच शिवाय दरवर्षीपेक्षा खर्च देखिल कमी झाला. त्यामुळे हा शेतकरी खूपच आनंदी असून त्याने ठरविले आहे की, यापूढे आता केवळ 8 गुंठयातच नाही तर सर्व क्षेत्रात एस आर आय पध्दतीनेच भात लागवड करणार आहे. कारण त्याने 8 गूंठयात केलेला प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याच्या उत्पन्नात दुपटीने फरक दिसून आला आहे.