भुमिगत बंधारा
भुमिगत बंधारा म्हणजे उलटा मातीचा नाला बांध म्हणावयास हरकत नाही. ज्याप्रमाणे भुपृष्ठावरील पाणलोट अडवून त्याची साठवण करण्यासाठी नाला बांध घातले जातात त्याचप्रमाणे भुमिजलाचे प्रवाह अडवुन त्याची जलथरात साठवण करण्यासाठी भुमिगत बंधारे घातले जातात. भुमिगत बंधारे म्हणजे जलसंधारणासाठी विकसीत केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान होय.
आवश्यकता :
भुमिजलाचे प्रवाह हे सर्वसाधारणपणे भुपृष्ठावरील जलप्रवाहांना समांतर असतात. भुमिजलाचे पुर्नभरण मुख्यत्वे पावसाच्या पाण्यातुन होते. पावसाळ्यात जेंव्हा पाऊस पडत असतो तेव्हा भुपृष्ठावरील प्रवाह भरून वाहत असतात व त्यावेळी काही पाणी जमिनीत मुरते / झिरपते व ते भुमिजलाचे पुर्नभरण करते. परंतु बहुतेक पाणी भुपृष्ठावरून वाहत जाऊन ते समुद्रात मिळते. हे वाया जाणारे पाणी थोपवुन जमिनीत जिरविण्यासाठी नाला बांध, पाझर तलाव, मृद व जलसंधारण उपचार केले जातात.
बहुतेक नाले पावसाळ्यानंतर कोरडे पडतात व यावेळी भुमिजलाचे पुर्नभरण होत नाही. परंतु याचवेळी पाण्याची गरज वाढत जात असल्याने भुमिजलाचा उपसा मात्र वाढतच असतो. त्यामुळे भुजलाचा साठा कमी होत जाऊन भुजल पातळी खोलवर जाते. भुमिजल प्रवाह अशावेळी जलवाहन रेषेत (नाला, नदी, ओहळ इ.) वाहत असतात ते जलथरातील आजुबाजुच्या स्त्रोतात पसरत नाहीत व त्यामुळे विहीरींच्या प्रभाव क्षेत्राचे पुर्नभरण होत नाही. यासाठी जर भुमिजलाचे प्रवाह अडवुन त्याची साठवण केली तर विहीरींच्या प्रभाव क्षेत्रातील जलथरांचे पुर्नभरण होऊ शकेल. यासाठी भुमिगत बंधा-याचे तंत्र विकसीत करण्यात आले आहे.
उद्देश :
- भुपृष्ठाखालील भूस्तरातून वाहून जाणारे पाणी भूस्तरात अपार्य अडथळा निर्माण करुन
भूपृष्ठात पाणी साठवणे.
- भूपृष्ठाची भूजल पातळी वाढविणे.
- भूमिजलाचे प्रवाह अडवून त्याची साठवण करणे व विहिरींच्या प्रभाव क्षेत्रातील जलथरांचे
पुनर्भरण करणे.
जागेची निवड :
- नाल्याचे पाणलोट क्षेत्र बंदिस्त द्रोणाच्या आकाराचे असावे म्हणजेच नाल्याच्या दोन्ही
बाजुकडून नाल्याचे पाणलोट क्षेत्रातील जलस्त्रोत नाल्याच्या काठाकडे उतरत आले असावेत.
- नाला पात्राचा उतार साधारणपणे 3 टक्के पेक्षा जास्त असु नये.
- लहान किंवा मध्यम आकाराचे ज्यांची रूंदी 30 ते 50 मी. असलेले नाले निवडावेत.
- नाला तळात जेथे वाळु असेल अशी जागा निवडावी. (1 मी.पेक्षा जास्त खोलीची वाळु)
- नाल्यात पावसाळ्यानंतर जलप्रवाह असू नये किंवा अत्यंत लहान प्रवाह असावा.
- नालापात्रात उघडा खडक असेल असे नाले निवडू नयेत.
- ज्या नाल्याला स्पष्ट बाजू आहेत व ज्यांचा तळ गाळाने / वाळुने भरला आहे असे नाले
उत्तम ठरतात.
- दोन बंधा-यातील अंतर 500 मी ते 1 कि.मी. असावे.
- भुमिगत बंधा-याची खोली 6 मी. पेक्षा जास्त असु नये.
- बंधा-याच्या परिसरातील क्षेत्रात विहीरींची घनता चांगली असावी .
- भुरकट व गडद पाणलोटातील जागा भुमिगत बंधा-यासाठी उत्तम असतात.
- सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जागा निवडू नये.
- बंधा-याच्या सभोवतालची जागा चिबड व पाणबोदाड होणारी नसावी.
- बंधा-याची जागा विहीरींच्या अनुस्त्रोत (खालच्या) भागात असावी.
- जलथराची पारगम्यता चांगली असावी म्हणजे बांधाच्या प्रभाव क्षेत्रातील विहीरींना
फायदा होतो
- वरील निकष पुर्ण करणारी जागा जर पाझर तलाव व नाला बांधाच्या अनुस्त्रोत भागात
असेल तर ती प्राधान्याने निवडावी.
भुमिगत बंधाऱ्याचा आकृतिबंध :
- नमुना खड्डयानुसार किती खोलीवर खडक आहे त्यानुसार 3 मी. ते 6 मी. खोली धरावी.
- भुमिगत बंधाऱ्यास दोन्ही बाजूस 2:1 उतार ठेवण्यात यावा.
- भुमिगत बंधाऱ्याची तळरुंदी 2 मी. ठेवावी.
- भुमिगत बंधाऱ्याचे खोदकाम नाल्याच्या दोन्ही काठात प्रत्येकी 1 मी. याप्रमाणे करावे व
त्याप्रमाणे बंधाऱ्याची लांबी ठरवावी.
- बंधाऱ्याची खोली व बाजू उतारानुसार माथा रुंदी ठेवण्यात यावी.
- अभेद्य भिंतीचे काम 0.25 मी. जाडीच्या थरा थराने करावे.