वळण चराऐवजी जैविक पट्टे (व्हेजिटेटिव्ह फिल्टर स्टिप इन प्लेस ऑफ डायव्हर्शन ड्रेन) -
पाणलोट क्षेत्रामध्ये वहितीखालील क्षेत्राचे वरचे बाजूस बिगर शेतीचे क्षेत्र असते. बिगर शेतीचे क्षेत्रामधून वहात येणारे पाणी शेतीचे क्षेत्रात येऊ नये म्हणून आतापर्यन्त डायव्हर्शन ड्रेन काढण्याची पध्दती होती. अशा डायव्हर्शन ड्रेनमुळे ब-याच ठिकाणी झाला असला तरी काही ठिकाणी घळी पडून मातीची धूप होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अशा घळयांची व्याप्तीसुध्दा वाढत जाते. सबब डायव्हर्शन ड्रेनचे काम पूर्णपणे निर्दोष नसल्याचे दिसून येते. म्हणून या कार्यक्रमांतर्गत सध्या डायव्हर्शन ड्रेनची कामे घेवू नयेत. त्याऐवजी त्या जागेवर 3 मीटर रुंदीच्या पट्टयांमध्ये गवताचे ठोंब, झुडुपे, झाडोरा इत्यादी वनस्पतींची दाट जाळी अथवा चाळण तयार करावयाची आहे की जेणे करुन वरील क्षेत्रातील पाणी सदर 3 मीटर रुंदीचे पट्टयामधील वनस्पतीचे जाळीमुळे अडविले जाऊन त्या जागेत मुरविले जाईल आणि वाहत येणारा गाळ सदर जाळीमुळे अडविला जाईल. तसेच वाहणा-या पाण्याच्या वेगावर काही प्रमाणात नियंत्रण येईल. हा तीन मीटरचा पट्टा वरील भागातून शेतात ज्या ठिकाणाहून पाणी येते त्या भागात करावयाचा आहे. सदर 3 मीटरचे पट्टयामध्ये खालीलप्रमाणे कामे करण्यात यावीत.
- प्रथम कामाचे नियोजन करुन उपचार नकाशा तयार करावा आणि अंदाजपत्रक तयार करुन सक्षम अधिका-याकडून मंजूर करुन घ्यावे.
- असा पट्टा वहिती क्षेत्राचे वरचे बाजूस आणि वहिती क्षेत्रात लगत परंतु बिगर वहितीक्षेत्रामध्ये घ्यावा.
- प्रथमत: जागेवर प्रस्तावित पट्टयासाठी समतल रेषेवर आखणी करावी.
- कामाचे जवळपास असलेल्या क्षेत्रामध्ये सुट्टे दगड (सुमारे 20 सें.मी. रुंदीचे) उपलब्ध असतील तर 3 मीटर पट्टयाचे वहिती क्षेत्राकडील बाजूचे हद्दीवर अशा दगडांची एक ओळ तयार करावी. मात्र सुट्टे दगड उपलब्ध नसल्यास हे काम केले नाही तरी चालेल. कोणत्याही परिस्थितीत जमिनीमध्ये गाडलेले दगड उकरुन काढू नयेत. असे दगड उकरुन काढल्यास माती उघडी पडून ती धुपण्याची शक्यता वाढते.
- तीन मीटर रुंदीच्या पट्टयाची आखणी करताना काही ठिकाणी खाचखळग्याचे किंवा नाल्याखालील क्षेत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी दगडांच्या छोटया ताली प्रस्तावित कराव्या लागतील. अशा तालींची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त नसावी आणि ही ताल वहिती क्षेत्रालगत असावी. उरलेल्या सुमारे 2 मीटरचे पट्टयात अशा वनस्पतींचे फाटे लावावेत की, ज्यांना पालवी फुटू शकेल आणि ज्यांची वाढ होईल. यथावकाश या ठिकाणी खस गवताचे ठोंब आणि इतर झुडुपे आणि वृक्ष जातींची पेरणी करावी.
- सदर 3 मीटरचे पट्टयामध्ये समतल रेषेवर हलकी नांगरट अथवा टिकावाच्या सहाय्याने खोदकाम करावे. हे काम पावसाळा संपल्याबरोबर लगेच हाती घ्यावे. म्हणजे पुढील काळात मातीचे बिदरिंग होईल.
- एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या पट्टयामधील ढेकळे फोडून घ्यावीत आणि माती एकसारखी करावी.
- पावसाळयाचे सुरुवातीला जनावरंकडून खाल्ली जात नाहीत अशा वनस्पतींची (झुडुपे आणि झाडे यांच्या जाती) बी पेरणी तीन ओळींमध्ये करावी. उदा. तरवड, चिल्लार, रुई, प्लेंटा, डिडोनिया, मोगली एरंड, निम,शिरस (काळा व पांढरा) चंदन, महारुख, काशिद, करंज, सेमल, शिसू ग्लिरिसिडीया, भेंडी, लिंबारा, विलायती चिंच, बाभूळ, मेंदी, पार्किन सोनिया, प्रोसोफिस (फक्त मुरुमी क्षेत्रात) पिट्टी खैर, सुबाळूळ, हादगा थायटी, सजाई, चारोळी, पळस, गरारी, टेंभुर्णी, मोहा, सौंदड, शिकेकाई, बिब्बा, सिताफळ, बोर याशिवाय स्थानिक जातीचे झुडुपे आणि वृक्ष यांचे बी सुध्दा पेरावे.
पावसाळयामध्ये खस गवताचे ठोंब 3 ओळीमध्ये (एक मीटर रुंदीमध्ये) दर 10 सें.मी. वर एक खस स्लीप्स यापध्दतीने लागण करावी. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर काही तासामध्ये खस स्लीप्सची लागवड झाली पाहिजे. अन्यथा खस ठोंब वाहून जाण्याची शक्यता असते. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर अशा खस ठोंबाच्या मुळया ओल्या मातीमध्ये दाबून बसवून या सर्व खस ठोबाचे मुळयाकडील भागाभोवती ओले केलेले किलतान गुंडाळून पक्के बांधावे आणि त्याची वाहतूक त्वरेने करुन खस ठोंब उपटल्यापासून जास्तीत जास्त 6 तासांचे आत त्यांची लागवड पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. या कामात अजिबात हयगय होता कामा नये.
- वरील बी पेरणी आणि खस लागवड याशिवाय योग्य अशा वनस्पतींच्या फांद्या लावूनसुध्दा वनस्पतींची दाट जाळी तयार करता येईल. अशा फांद्या बी पेरलेल्या ओळी आणि खस स्लीप्सच्या ओळी यांच्यामधील भागात लावाव्यात. यासाठी पुढील जाती उपलब्ध आहेत पांगारा, शिसू, सलाई, भेंडी, लेंडी, एरंडाच्या जाती, विलायती चिंच, शेर, साबर वगैरे.
- याशिवाय घायपात सर्कल तीन ते चार ओळीमध्ये स्टँगर्ड पध्दतीने लावावे. एकाच ओळीमधील दोन घायपात सर्कल मधील अंतर 0.50 मीटर इतके ठेवावे.
- याशिवाय स्थानिक पातळीवरील गवताचे बियाणे पेरावे तसेच गवताचे ठोंब यांची दाट लागवड करावी.
वरील वनस्पतीची लागवड अशा पध्दतीने करावी की, वरुन वाहत येणारे पाणी व माती अडविले जाईल. या संपूर्ण कामास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कामाची कार्यवाही करताना जमिन मालकांचे सक्रीय सहकार्य आणि सहभाग उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खोदाई, बी पेरणे, लागवड, संरक्षण शक्य असल्यास गरजेनुसार पाणी देणे वगैरे स्वरुपाची कामे जमिन मालकावर सोपवावीत आणि प्रत्येक काम समाधानकारक रितीने पूर्ण झाल्यावर जमीन मालकास त्या कामापोटी पेमेंट अदा करावे. काम चालू असताना त्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे.