सर्वसाधारण माहिती

                                                किटकनाशके गुणवत्ता नियंत्रण

            कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सन 1983 पासून स्वतंत्र गुणनियंत्रण यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत गुण नियंत्रणाचे सनियंत्रण केले जाते. किटकनाशकांचे उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक, वहातूक इ. बाबत नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तसेच मनुष्य व प्राणी यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून देशात किटकनाशक अधिनियम, 1968 व किटकनाशक नियम, 1971 हे कायदे राबविले जातात. या कायद्यांतर्गत किटकनाशकांचे उत्पादन व विक्री करण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या परवाना अधिका-यांकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाने घेण्यापूर्वी उत्पादकाला संबंधित किटकनाशकासाठी कायद्याने निर्माण केलेल्या केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे लागते. नोंदणी प्रमाणपत्र देताना अतिशय कडक नियम असून संबंधित किटकनाशकाच्या संशोधन व प्रक्षेत्र पातळीवरील डेटा, संबंधित किटकनाशकाची विषकारकता, पिकावरील व पर्यावरणावरील परिणाम याबाबतचा डेटा सादर करावा लागतो. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उत्पादकाला राज्यात उत्पादन परवाना घ्यावा लागतो. नविन उत्पादन परवाना देताना संबंधित उत्पादनस्थळाची संयुक्त तपासणी समितीद्वारे तपासणी केली जाते. सदर संयुक्त तपासणी समितीमध्ये कृषि विभागाबरोबर कामगार विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, औद्योगिक स्वास्थ सुरक्षा विभाग यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून उपस्थित असतात.

किटकनाशक अधिनियम 1968 मधील सूची 1 मध्ये 870 किटकनाशके असून त्यापैकी 272 किटकनाशकांची नोंदणी समितीकडे नोंदणी झालेली आहे. कायद्याच्या सूचीतील किटकनाशकांपैकी 12 जैविक किटकनाशकांची नोंदणी समितीकडे नोंदणी झालेली आहे.

राज्यात साधारणपणे 161 किटकनाशक उत्पादक असून बाह्यराज्यातील 190 किटकनाशक उत्पादक राज्यात किटकनाशकांची विक्री करतात. राज्यातील 161 उत्पादकांपैकी 46 उत्पादक हे जैविक किटकनाशकांचे उत्पादन करतात. त्यापैकी 10 राज्यशासनाच्या जैविक किटकनाशक प्रयोगशाळा असून 1 कृषि विद्यापीठ, 4 कृषि विज्ञान केंद्रे, 1 महाबीज अशी 16 उत्पादन युनिट सार्वजनिक क्षेत्रात तर उर्वरित 30 जैविक किटकनाशक उत्पादक खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत.

 किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी राज्यात 35 परवाने अधिकारी, 9 अपिलीय अधिकारी, 4 किटकनाशक चाचणी प्रयोगशाळा, 34 विषबाधा रिपोर्टींग ॲथॉरिटी, 1131 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, 395 भरारी पथके कार्यरत आहेत.