Side Menu Packages of Practice

भेंडी

प्रस्‍तावना

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.

जमीन व हवामान

भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.

वाण

पुसा सावनी सीलेक्‍शन 2-2 फूले उत्‍कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या सुधारीत जाती लागवडीस योग्‍य आहेत.

बियाणांचे प्रमाण

खरीप हंगामात हेक्‍टरी 8 किलो आणि उन्‍हाळयात 10 किलो बियाणे पुरेसे होते. 1 किलो बियाण्‍यास पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम चोळावे.

पूर्वमशागत व लागवड

जमिनीचे मशागत एक नांगरट व दोन कुळवण्‍या करुन जमिन भुसभूशित करावी व हेक्‍टरी 50 गाडया शेणखत मिसळून तिसरी कोळवणी करावी. पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 60 सेमी ठेवावे. आणि उन्‍हाळयात 45 सेमी ठेवावे. एक ओळीतील दोन झाडांत 30 सेमी अंतर राहील अशा बेताने बी टोकावे प्रत्‍येक ठिकाणी दोन बियांणी टोकणी करावी. उन्‍हाळयात स-या पाडून वरंब्‍याच्‍या पोटाशी बी टोकावे. शेतात ओलवणी करुन वाफसा आल्‍यानंतर बी पेरावे.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

पेरणीच्‍या वेळी 50-50-50 किलो हेक्‍टर नत्र स्‍फूरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणीनंतर एक महिन्‍याचे कालावधीने नत्राचा दुसरा हप्‍ता 50 किलो या प्रमाणात दयावा. पेरणीनंतर हलके पाणी दयावे. त्‍यानंतर 5 ते 7 दिवसांच्‍या अंतराने पाण्याच्‍या पाळया दयाव्‍यात.

आंतरमशागत

एक कोळपणी व दोन निंदण्‍या करुन शेतातील तणांचा बदोबस्‍त करावा.

रोग व किड

भुरी : भेंडीवर प्रामुख्‍याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

उपाय : या रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍यात मिसळणारे गंधक 1 किलो किंवा डायथेनएम 45, 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.

किड : भेंडी पिकास मावा तुडतुडे शेंडेअळी लाल कोळी या किडींचा प्रादूर्भाव होतो.

उपाय : या किडींच्‍या नियंत्रणासाठी 35 सीसी एन्‍डोसल्‍फान 1248 मिली किंवा सायफरमेथीरीन 35 सी सी 200 मिली 500 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे. पहिली फवारणी उगवणीनंतर 15 दिवसांनी नंतरच्‍या फवारण्‍या 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.

काढणी व उत्‍पादन

पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात. दर 3 ते 4 दिवसांनी फळे काढणीला येतात. परभणी क्रांती हा वाणी केवडा रोगास बळी पडत नसल्‍याने इतर वाणांपेक्षा 3 ते 4 आठवडे अधिक काळ पर्यंत फळांची तोडणी करता येते. त्‍यामुळे अधिक उत्‍पादन येते. खरीप हंगामात हिरव्‍या फळांचे उत्‍पादन हेक्‍टरी 105 ते 115 क्विंटल निघते तर उन्‍हाळी हंगामात 75 ते 85 क्विंटल निघते