भुमिगत बंधारा म्हणजे उलटा मातीचा नाला बांध म्हणावयास हरकत नाही. ज्याप्रमाणे भुपृष्ठावरील पाणलोट अडवून त्याची साठवण करण्यासाठी नाला बांध घातले जातात त्याचप्रमाणे भुमिजलाचे प्रवाह अडवुन त्याची जलथरात साठवण करण्यासाठी भुमिगत बंधारे घातले जातात. भुमिगत बंधारे म्हणजे जलसंधारणासाठी विकसीत केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान होय.
भुमिजलाचे प्रवाह हे सर्वसाधारणपणे भुपृष्ठावरील जलप्रवाहांना समांतर असतात. भुमिजलाचे पुर्नभरण मुख्यत्वे पावसाच्या पाण्यातुन होते. पावसाळ्यात जेंव्हा पाऊस पडत असतो तेव्हा भुपृष्ठावरील प्रवाह भरून वाहत असतात व त्यावेळी काही पाणी जमिनीत मुरते / झिरपते व ते भुमिजलाचे पुर्नभरण करते. परंतु बहुतेक पाणी भुपृष्ठावरून वाहत जाऊन ते समुद्रात मिळते. हे वाया जाणारे पाणी थोपवुन जमिनीत जिरविण्यासाठी नाला बांध, पाझर तलाव, मृद व जलसंधारण उपचार केले जातात.
बहुतेक नाले पावसाळ्यानंतर कोरडे पडतात व यावेळी भुमिजलाचे पुर्नभरण होत नाही. परंतु याचवेळी पाण्याची गरज वाढत जात असल्याने भुमिजलाचा उपसा मात्र वाढतच असतो. त्यामुळे भुजलाचा साठा कमी होत जाऊन भुजल पातळी खोलवर जाते. भुमिजल प्रवाह अशावेळी जलवाहन रेषेत (नाला, नदी, ओहळ इ.) वाहत असतात ते जलथरातील आजुबाजुच्या स्त्रोतात पसरत नाहीत व त्यामुळे विहीरींच्या प्रभाव क्षेत्राचे पुर्नभरण होत नाही. यासाठी जर भुमिजलाचे प्रवाह अडवुन त्याची साठवण केली तर विहीरींच्या प्रभाव क्षेत्रातील जलथरांचे पुर्नभरण होऊ शकेल. यासाठी भुमिगत बंधा-याचे तंत्र विकसीत करण्यात आले आहे.