जुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती

जुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती

पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भ विभागात मोठया प्रमाणात मजगीची कामे अनेक वर्षापासून करण्यात आलेली आहेत. तसेच खाजगीरित्या मोठया प्रमाणात क्षेत्र भात पिकाच्या लागवडीखाली आले आहे. तथापि राज्यात सातत्याने होणारी अतिवृष्टी व इतर बाबींमुळे भात खाचराच्या बांधाचे व भात खाचराचे धुपीमुळे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बांध हा मजगी /भात खाचराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बांध अंशत: अथवा पुर्णपणे फुटल्याने, ढासळल्याने इ.मुळे खाचरामध्ये पुर्ण क्षमतेने पाणी साठत नाही किंवा अडले जात नाही व त्याचा भात पिकाचे उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. किंबहूना बांध फुटीमुळे पूर्वी लागवडीसाठी असलेले क्षेत्राचे पड क्षेत्रात रुपांतर होत आहे. अशा क्षेत्रातील बांधाची व खाचराची दुरुस्ती करुन मिळणेबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी विचारात घेऊन नियोजन विभाग शासननिर्णय क्र. रोहयो-2007/प्र.95/रोहयो-1, दि. 4 मे 2009 अन्वये भात शेती बांध दुरुस्तीची कामे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत घेण्यास मान्यता मिळाली असून शासननिर्णय क्र. मग्रारो-2009/प्र.166/मग्रारो-1,दि. 20 जानेवारी 2010 अन्वये त्याचे आर्थिक मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. अशी कामे हाती घेतांना खालील मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात यावी.

क्षेत्र निवडीचे निकष :-

  • सदर गटासाठी/कामासाठी निवडलेले क्षेत्रात पूर्वी मजगी/भात खाचरांची कामे खात्यामार्फत अथवा खाजगीरित्या झालेली असली पाहिजेत.
  • सात बारा उताऱ्यावर भात पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
  • खाचरांचे बांधाची किमान 50 टक्के पेक्षा अधिक धुप झालेली असावी म्हणजेच बांधाचा छेद 0.40 चौ.मी. पेक्षा कमी झालेला असावा.
  • अशा कामासाठी नियमानुसार शेतकऱ्यांची संमती घ्यावी.
  • तालुका कृषि अधिकारी यांनी कामासाठी निवडलेल्या क्षेत्रातील अंदाजपत्रकात नमुद केलेला जुन्या बांधाचा छेद बरोबर असल्याचे प्रत्यक्ष तपासणी करुन प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत देणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष काम करणे :-

प्रत्यक्ष काम करतांना प्रत्येक खाचराचे बांधासाठी लागणारे परिमाण त्या त्या खाचरामध्ये असलेल्या उंचवट्यावरुन घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत 0.15 मी. पेक्षा जास्त खोदकाम करु नये. खोदकाम करतांना खाचर समपातळीमध्ये येईल किंवा राहील याची दक्षता घ्यावी. दुरुस्त करावयाच्या बांधाचा छेद प्रत्येक ठिकाणी एकसारखा येईल याची दक्षता घ्यावी.

जुनी भात शेती दुरुस्ती बांधाचे संकल्पचित्र