१.१ मानक संस्थेचे (आय.एस.आय) चिन्ह असलेली, खात्रीच्या उत्पादकांची आणि आपल्या माहितीच्या विक्रेत्यांकडून कीडनाशके विकत घ्यावीत. कीडनाशके विकत घेताना वेष्टनावर नोंदणी क्रमांक, उत्पादनाचा दिनांक, वापरण्याची मुदत, संपण्याचा दिनांक इत्यादि माहिती असल्याची खात्री करावी. कीडनाशक वापरण्याची मुदत विकत घेतलेल्या कीडनाशकाच्या प्रतीबाबत शंका अस्लायस ताबडतोब कृषि विभागाच्या स्थानिक अधिका-यास भेटावे.
१.२ कृषि विभागाच्या पिक संरक्षण वेळापत्रकात शिफारस केल्याप्रमाणेच कीडनाशकांची मात्रा वापरावी.
१.२ कृषि विभागाच्या पिक संरक्षण वेळापत्रकात शिफारस केल्याप्रमाणेच कीडनाशकांची मात्रा वापरावी.
१.३ किडीची वाढ जास्त होऊ न देता ती थोड्या प्रमाणात आणि कीडनाशकांना चांगला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असतानाच त्यांचे नियंत्रण करावे. उदा. अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अळ्या प्रथमावस्थेत असताना त्याचप्रमाणे सोयोबीनवरील पाने खाणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी पानावर इजा दिसताच उपाययोजना करणे किफायतशीर असते.
१.४ शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे द्रावणे तयार करावीत. पाण्यात मिसळणा-या भुकटीचे द्रावण करताना प्रथम थोड्या पाण्यात दिलेल्या मात्रेप्रमाणे भुकटी टाकून चांगले ढवळून मिसळावे. नंतर त्यात पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिसळावे. प्रवाही किडनाशकाच्या बाबतीत प्रथम थोड्या पाण्यात कीडनाशक टाकून नंतर शिफारशीनुसार पाणी मिसळावे.
१.५ मावा, तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजूस राहून पानातील अन्नरस शोषूण करुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या किडीच्या नियंत्रणासाठी विशेषत: स्पर्शजन्य कीडनाशके वापरताना ती पानांच्या मागील बाजूस फवारणे अत्यंत जरुरीचे आहे. भातावरील तपकिरी तुडतुड्यांचे नियंत्रणासाठी विशेषत: भातावरील भाताच्या बुंध्याकडील भागावर जेथे तुडतुडे शोषण करतात, तेथे किडनाशक फवारणे आवश्यक आहे. इतर भागावर फवारणी करुन ती परिणामकारक होणार नाही, तसेच ज्वारीवरील मिजमाशीच्या बाबतीत फक्त कणसावरच उपाययोजना करणे जरुरीचे असते.
१.६ फवारणी केल्यानंतर जोराचा पाऊस झाल्याने फवारणी वाया जाऊन किडींचे नियंत्रण होत नाही. यासाठी पावसाळी हवामानात फवारणी करताना द्रावणात योग्य ते चिकट द्रावण योग्य त्या प्रमाणात मिसळल्यास फवारणीनंतर झिमझिम पाऊस झाला, तरी किडनाशक धूऊन जाण्याची शक्यता कमी राहते.
१.७ धूरळणी सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना करावी.
१.८ कीडनाशकाचा परिणाम दिसून येण्यास फवारणीनंतर काही कालावधी लागतो. त्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येतो. त्याप्रमाणे काही किडींमध्ये पीक वाढीच्या काळात एकापेक्षा जास्त पिढ्या तयार होतात, त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार कीडनाशकाच्या २ ते ३ फवारण्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
१.९ एकाच कीडनाशकाचा वापर सतत केल्याने किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. त्यासाठी शिफारस केलेल्या किडनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.